Tuesday, May 19, 2009

रेस सेमी फायनलची...

आयपीएल टू मध्ये सेमीफायनलची रेस आता टिपेला पोहोचलीय. दिल्ली डेयरडेव्हिल्सनी हमसे आगे कोई नही म्हणत सेमीफायनलमधील स्थान आधीच पक्क केलंय तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट स्पर्धेतनं केव्हाच बाहेर पडल्यायत. सेमी फायनलच्या तीन जागांसाठी आता पाच टीम्स मैदानात आहेत.

गतविजेते राजस्थान रॉयल्स यंदा मात्र आयपीएलची सेमी फायनल गाठण्यासाठी धडपडताना दिसतायत. शेन वॉर्नच्या या टीमनं यंदा १३ पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा रनरेटेय - 0.360. त्यामुळं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर त्यांना मोठा विजय मिळवावाच लागेल. पम सेमी फायनल गाठण्यासाठी राजस्थानला फक्त विजयच नाही तर नशीबाचीही साथ हवीय. काऱण चेन्नई आणि पंजाब आणि बँगलोर आणि हैदराबाद यांच्यातल्या निकालांवरही राजस्थानचं भविष्य अवलंबूनेय.

महेन्द्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग्ज सेमी फायनलच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवरेयत कारण सुपरकिंग्जनी आत्तापर्यंत 15 पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा नेट रनरेटही बाकीच्या चार टीम्सपेक्षा जास्तंय. खरंतर फायनल फोरचं तिकिट कन्फर्म करण्यासाठी चेन्नईला अवघ्या एका विजयाची गरज होती. पण कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांचा पराभव केल्यानं मोठंच वादळ उठलंय. त्यामुळं किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. अर्थात पराभव झाला तरी नेट रनरेटच्या जोरावर सुपरकिंग्जची नौका तरून जाऊ शकते.

सुपरकिंग्जना आता आव्हान असणारेय किंग्ज इलेव्हन पंजाबचं. दोन्ही किंग्जच्या या लढतीत बरंच काही पणाला लागेल. प्रीतीच्या या टीमच्या खात्यात 14 पॉइंट्स आहेत पण त्यांचा रनरेट आहे -मायनस 0.423. जो रेसमधल्या बाकीच्या टीम्सपेक्षा कमीय. त्यामुळं पॉइंट्समध्ये टाय झाला तर कमी रनरेटमुळं पंजाबचं सेमी फायनलचं बर्थ हुकण्याची शक्यताय. त्यामुळं सेमी फायनल गाठायची असेल तर त्यांना चेन्नई विरुद्ध विजय मिळवावाच लागेल.

तर किंग्ज इलेव्हननी केलेल्या पराभवानं हैदराबादपुढंही संकट निर्माण झालंय. डेक्कन चार्जर्सच्या चार्जिंग बुलला आता चौखूर उधळावंच लागेल. चार्जर्सचा नेट रनरेटेय 0.265 , आणि त्यांच्या खात्यात 14 पॉइंट्सेत. पण सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी गिली आणि कंपनीला विजय मिळवावाच लागेल. त्यामुळं आयपीएलच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये बँगलोरवर डेक्कन जोरदार हल्ला चढवताना दिसतील.
थोडक्यात काय तर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पहावी लागणारेय.

Tuesday, May 12, 2009

Some times, even if you dont want to, you have to terminate certain things. and start afresh.

That's why I started this blog a year ago. but a lot has happened over he year and I just dint feel continuing this blog.. so I have decided to start a new one.

But from now on, This blog will be my place to write about books, films and stuff like that. Hope to write here again..

Friday, April 10, 2009

क्रिकेट ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड

ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट आता लवकरंच एव्हरेस्टची उंची गाठणारेय... निमित्तय एव्हरेस्ट बेस कँपजवळ आयोजित करण्यात आलेल्या एका चॅरिटी क्रिकेट मॅचचं...
इंग्लंडमधल्या ५० क्रिकेटप्रेमी गिर्यारोहकांचं एक पथक एव्हरेस्टवर क्रिकेटमॅच खेळण्यासाठी गुरुवारी लॉर्डस येथून रवाना झालंय.
द टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार या पथकातील गिर्यारोहकांची दोन टीम्समध्ये विभागणी करण्यात आलीय. एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणा-या एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे या दोघांच्या नावांनी या क्रिकेट टीम्स ओळखल्या जातील.
एव्हरेस्ट बेस कँपजवळ 'गोरॅक शेप' या गोठलेल्या तळ्यावर ही मॅच खेळली जाणारेय. त्यासाठी खास आर्टिफिशियल फोल्डिंग पीचही तयार करण्यात आलंय. या मॅचमध्ये प्लेयर्स लाकडी स्टम्प्स आणि बॅटचा वापर केला जाईल. पण बॉलचा रंग मात्र गुलाबी असणारेय, कारण बर्फावर गुलाबी रंग उठून दिसतो. येत्या अकरा दिवसांत हे प्लेयर्स एव्हरेस्ट बेस कँपवर पोहोचतील आणि 17 हजार फूटांवर ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच खेळतील. त्यामुळं लवकरंच क्रिकेट बनणारेय सर्वात जास्त उंचीवर खेळला गेलेला स्पोर्ट...

Wednesday, April 8, 2009

मारिया मारिया

मारिया! तू चली आ... लाखो टेनिस चाहते सध्या हेच बोलतायत.. कारण टेनिस कोर्टवर आठ महिन्यांत मारिया शारापोव्हाचं दर्शन घडलेलं नाही...

ऑगस्ट २००८ मध्ये शारापोव्हाचा खांदा दुखावल्यानं तिनं मॉन्ट्रियाल ओपनमधून माघार घेतली. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत शारापोव्हा एकही सिंगल्स मॅचमध्ये खेळलेली नाही. तिचं रँकिंगही आता तीसपर्यंत खाली घसरलंय...

महिला टेनिसमध्ये सध्या टॉप रँकिंगसाठी जबरदस्त स्पर्धा सुरूय. पण बँक बॅलन्सच्या बाबतीत तरी शारापोव्हाचं अव्वल स्थान कायमेय. शारापोव्हाची कमाई सुमारे तीस दशलक्ष यूएस डॉलर्सवर जाऊन पोहोचलीय आणि आठ महिने खेळापासून दूर राहूनही ती सर्वात श्रीमंत महिला क्रीडापटूय. शारापोव्हाच्या तुलनेत सेरेना विल्यम्सची कमाई साधारण निम्मी म्हणजे १५ दशलक्ष यूएस डॉलर्स तर व्हीनसची १३ दशलक्ष यूएस डॉलर्स इतकीय. तर खेळ आणि रुप दोन्हीमध्ये शारापोव्हाला टक्कर देणा-या क्यूट सर्ब अॅना इव्हानोविचच्या बँकमध्ये केवळ ६ ते ७ दशलक्ष यूएसडॉलर्स जमाएत.

सेरेना असो किंवा व्हीनस, अॅना असो किंवा येलेना, किंवा आणखी कोणी, मारिया की बात ही कुछ और है.. जगभर जाहीरातींमध्ये झळकणारा चेहरा... रोज किमान ६० लाख इंटरनेटवर सर्च हिट्स.. मोठमोठ्या कंपन्यांची मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स आणि हे सारं काही वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी..


विशेष म्हणजे शारापोव्हाच्या खेळावर या अमाप प्रसिद्धीचा फारसा परिणाम झालेला नाहीय. २००४ मध्ये विम्बल्डन जिंकून शारापोव्हानं टेनिस विश्वात आपलं साम्राज्य निर्माण केलं. त्यानंतर एक फ्रेन्च ओपनचा अपवाद वगळता बाकी तीन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला यश आलंय.
पण खांद्याच्या दुखापतीनं पुन्हा पुन्हा डोकं वर काढल्यानं शारापोव्हाला टेनिसपासून काही काळ दूर राहिलीय. म्हणूनच तिचे चाहते तिची वाट पाहतायत..

लवकरच ती परत येणारेय...गेल्या महिन्यांत इंडियाना वेल्स स्पर्धेत शारापोव्हा एका डबल्स मॅचमध्ये खेळली. मात्र सिंगल्सपासून ती अजून महिनाभर तरी दूर राहणारेय.. त्यानंतर टेनिसची ही ग्लॅमगर्ल फॅशननगरी पॅरिसमध्ये पुन्हा टेनिसकोर्टवर आपले जलवे दाखवताना दिसेल अशीच अपेक्षाय.
जान्हवी मुळे

Tuesday, March 3, 2009

लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर झालेल्या हल्ल्यानं क्रिकेट जगत सुन्न झालंय. दहशतवादापासून क्रिकेट दूर नाही, आतंकवादाचा हा भस्मासूर कोणाचाही बळी घेऊ शकतो, हे दाहक वास्तव पुन्हा एकदा प्रकर्षानं पुढं आलंय.

आजवर क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाचे डावपेच अनेकदा खेळले गेलेयत. पण एखाद्या अतिरेकी संघटनेनं क्रिकेटपटूंवरच थेट सशस्त्र हल्ला करण्यची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही ही घटना पाकिस्तानसारख्या क्रिकेटवेड्या देशात व्हावी ह्यासारखं दुर्दैव नाही.

खेळाची मैदानं आणि खेळाडू दहशतवाद्यांसाठीही सॉफ्ट टारगेट बनत चालले आहेत. खेळाडूंवर, स्टेडियमवर हल्ला केला म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जाणार याची हल्लेखोरांना खात्री असते. त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न आजवर अनेक अतिरेकी संघटनांनी केलाय. खेळांच्या इतिहासतल्या अशाच काही रक्तरंजित घटनांचा हा एक आढावा:

1) म्युनिक हत्याकांड १९७२ – ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या इस्राएलच्या ११ खेळाडूंचं ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेकडून अपहरण आणि हत्या.

ऑलिम्पिक म्हणजे जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचं प्रतीक. पण १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकदरम्यान जे घडलं त्यातून सावरायला जगाला बराच वेळ लागला होता. ऑलिम्पिक म्हणजे दुस-या महायुद्धातून उभं राहणा-या जर्मनीसाठी आपली प्रगतीच्या दिशेनं चाललेली वाटचाल जगापुढे आणण्याची मोठी संधी होती. पण जगाच्या इतिहासात म्युनिक ऑलिम्पिकची नोंद वेगळ्याच कारणासाठी व्हायची होती.

५ सप्टेंबर १९७२ रोजी पहाटे अतिरेकी संघटना ब्लॅक सप्टेंबरच्या आठ सदस्यांनी म्युनिक ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इस्राएली खेळाडूंच्या डॉर्मिटरीत शस्त्रास्त्रांसह गुपचूप प्रवेश केला. हल्लेखोरांनी दोन इस्राएलींना ठार केलं तर इतर नऊ जणांना ओलिस ठेवलं. खेळाडूंच्या बदल्यात इस्राएलच्या ताब्यातील २००हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. जर्मन सरकारबरोबर दिवसभर असफल वाटाघाटी केल्यावर अपहरणकर्त्यांनी ओलिसांसह जर्मनीबाहेर जाण्याची मागणी केली. मात्र विमानतळावर जर्मन स्नायपर्सबरोबर झालेल्या चकमकीत सर्व नऊ खेळाडूंबरोबरच पाच अतिरेकी मृत्यूमुखी पडले.

म्युनिक ऑलिम्पिकपूर्वी ऑलिम्पिक व्हिलेज म्हणजे उत्सवाचा मांडव असायचा. १९७२ नंतर प्रत्येक ऑलिम्पिकच्या वेळी ऑलिम्पिक व्हिलेजला लष्करी तळाचं रुप प्राप्त झालेल दिसलं.

एरवी ‘मध्यपूर्वेतली राष्ट्रं पाहून घेतील, हा त्यांचा प्रश्नंय’ अशीच बहुतांशी युरोपियन राष्ट्रांची पश्चिम आशियातल्या अस्थिरतेवरची भूमिका असे. पण म्युनिकनंतर हे सगळं बदललं. पॅलेस्टाईन आणि इस्राएलमधला वाद त्यामुळं आंतरराष्ट्रीय समुदायापुढचा कळीचा मुद्दा बनला.

‘ब्लॅक सप्टेंबर’च्या त्या यशामुळं इतर अतिरेकी संघटनांनाही हिंसाचाराचा एक सोपा मार्ग दिसून आला आणि खेळांची मैदानंही सुरक्षित राहणार नाहीत ह्याची जगाला जाणीव झाली.

२) १९८७ - सेऊल ऑलिम्पिक तोंडावर आलेलं असताना, कोरियन एअरलाईन्सचं एक विमान ब्रह्मदेशाच्या हवाई हद्दीत झालेल्या स्फोटात नष्ट झालं. ही घटना म्हणजे अपघात नसून ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम घडवण्याचा उत्तर कोरियन अतिरेक्यांचा प्रयत्न होता असा दावा दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चुन हुआन यांनी केला.

३) १९९२ – इटीए या स्पॅनिश फुटीरतावादी गटानं बार्सेलोना ऑलिम्पिकदरम्यान हल्ला करणार असल्याची धमकी दिली. मात्र कोणताही घातपात झाला नाही, त्यामुळं आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

४) १९९६ – २७ जुलैच्या सकाळी अटलांटा इथं ऑलिम्पिक सेंटेनियल पार्कजवळ एका पाईपबॉम्बच्या स्फोटात एक मृत्युमुखी आणि १०० जखमी. अमेरिकेतील एका अंतर्गत अतिरेकी गटाचा सदस्य एरिक रॉबर्ट रुडॉल्फला हल्ल्यासाठी दोषी मानण्यात आलं.

५) २००३ – अथेन्स ऑलिम्पिकची तयारी सुरू असतानाच २२ जून रोजी ग्रीसच्या अधिका-यांनी प्लॅतियाली या लहानशा बंदराजवळ एक जहाज ताब्यात घेतलं. जहाजावरून तब्बल ७५० टन स्फोटकं जप्त करण्यात आली.

६) ५ मे २००४ – अथेन्सच्या एका उपनगरात पोलिस स्टेशनबाहेर ३ बॉम्बस्फोट. ‘रिव्होल्युशनरी स्ट्रगल’ या ग्रीक अतिरेकी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, तसंच ऑलिम्पिकदरम्यान घातपात करण्याचा इरादा जाहीर केला.

Monday, February 2, 2009

बॅटल इज स्टिल ऑन!

“People are trapped in history and history is trapped in them.”
– James Baldwin


इतिहासात क्वचितच असा क्षण येतो जेव्हा काळालाही थोडं थांबावंसं वाटतं. एक तारा मावळतीकडे झुकतो आणि दुसरा तेजानं तळपू लागतो आणि त्या दोघांच्याही प्रकाशानं आसमंत उजळून निघतो.


यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदालनं टेनिसला असेच काही यादगार क्षण मिळवून दिलेयत. चार तास तेवीस मिनिटं चाललेल्या या सामन्याचा निकाल अखेर नदालच्या बाजूनं ७-५, ३-६, ७-६, ३-६ आणि २-६ असा लागला. पण एक पाचव्या सेटचा अपवाद वगळता, टेनिस कोर्टवर दोघांच्यात रंगलेली लढाई अर्थातच डोळ्यांचं पारणं फेडणारी होती.

तशी ती नेहमीच असते. फक्त यावेळी हे नाट्य रंगलं ते पॅरिसच्या किंवा लंडनच्या नाही तर मेलबर्नच्या रंगमंचावर. चढत्या रात्रीबरोबर टेनिसलाही रंग चढत गेला, नेट्सच्या दोन्ही बाजूंनी खेळल्या गेलेल्या शॉट्सनी अंगावर अक्षरशः काटा उभा रहात होता.

पण माझ्या कायम लक्षात राहतील ते हा सामना संपल्यानंतरचे काही क्षण. प्राईझ डिस्ट्रिब्युशनच्यावेळी बोलताना भावनावेगानं फेडररचं अडखळणं, चाहत्यांमधून आलेल्या ‘We still love you Roger’च्या आरोळ्या आणि अखेर टेनिसच्या महानायकाच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू..
होय. फेडरर रडला. एखाद्या लहान मुलासारखं निरागसपणे त्यानं आपल्या भावनांना वाट करून दिली. पण ते अश्रू पराभवाचे किंवा त्यामुळं झालेल्या निराशेचे नव्हते. तर स्वतःच्या चुकांमुळं जेतेपदाची संधी गमावल्याची खंत त्याला डाचत होती. आणि या परिस्थितीतही आपल्या चाहत्यांनी आपली साथ सोडलेली नाहीय, हे त्याला कळत होतं.






फेडररच्या त्या अश्रूंनी प्रतिस्पर्धी नदालही भारावून गेला. लीजंडरी रॉड लेव्हरच्या हातून ट्रॉफी स्वीकारल्यावर नदालनं सर्वात आधी फेडररला आलिंगन दिलं. कुणीतरी म्हटलंच आहे, "A man must be a hero to understand a hero". आणि नदालनं तेच दाखवून दिलं.
खरंतर हा सामना सुरू होण्याआधी माजी टेनिसपटू जॉन न्यूकोम्बचा अपवाद वगळता कोणीही नदालला जेतेपदासाठी फेव्हरेट मानत नव्हतं. अगदी रॉड लेव्हरपासून ते जॉन मॅकेनरोपर्यंत सर्वांनीच फेडररच्या बाजूनं झुकतं माप दिलं. पण त्या सर्वांचे अंदाज नदालनं खोटे ठरवलेयत.

क्ले कोर्टच्या बादशाहनं आधी विम्बल्डनची हिरवळ गाजवली आणि आता मेलबर्न पार्कवर कब्जा करत आपलं अव्वल स्थानही सिद्ध केलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मिळणा-या प्रत्येक विजयाबरोबरच त्याचा स्वभावही अधिकाधिक विनम्र बनत चाललाय- एखाद्या ख-या चॅम्पियनसारखाच.
फेडरर चौदा ग्रँड स्लॅम जिंकत पीट सॅम्प्रसच्या रेकॉर्डची बरोबरी करेलही, पुढं जाऊन तो त्याचा हा रेकॉर्ड मोडेलही. कदाचित आपलं अव्वल स्थानही तो परत मिळवेल. पण वय आणि फॉर्म सध्या नदालची साथ देतायत. फेडररनं वयाच्या तेविसाव्या वर्षी आपलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवलं होतं, तर तेविसाव्या वर्षी नदालच्या खात्यात सहा जेतेपदं जमा आहेत, हे विसरून चालणार नाही.
फेडरर आणि नदालमधल्या रायव्हलरीच्या या कहाणीचा शेवट कोणाच्याही बाजूनं होवो, त्यांच्यात रंगणा-या प्रत्येक सामन्याबरोबर टेनिस आणखी समृद्ध होत चाललंय.