“People are trapped in history and history is trapped in them.”– James Baldwin
इतिहासात क्वचितच असा क्षण येतो जेव्हा काळालाही थोडं थांबावंसं वाटतं. एक तारा मावळतीकडे झुकतो आणि दुसरा तेजानं तळपू लागतो आणि त्या दोघांच्याही प्रकाशानं आसमंत उजळून निघतो.
यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदालनं टेनिसला असेच काही यादगार क्षण मिळवून दिलेयत. चार तास तेवीस मिनिटं चाललेल्या या सामन्याचा निकाल अखेर नदालच्या बाजूनं ७-५, ३-६, ७-६, ३-६ आणि २-६ असा लागला. पण एक पाचव्या सेटचा अपवाद वगळता, टेनिस कोर्टवर दोघांच्यात रंगलेली लढाई अर्थातच डोळ्यांचं पारणं फेडणारी होती.
तशी ती नेहमीच असते. फक्त यावेळी हे नाट्य रंगलं ते पॅरिसच्या किंवा लंडनच्या नाही तर मेलबर्नच्या रंगमंचावर. चढत्या रात्रीबरोबर टेनिसलाही रंग चढत गेला, नेट्सच्या दोन्ही बाजूंनी खेळल्या गेलेल्या शॉट्सनी अंगावर अक्षरशः काटा उभा रहात होता.
पण माझ्या कायम लक्षात राहतील ते हा सामना संपल्यानंतरचे काही क्षण. प्राईझ डिस्ट्रिब्युशनच्यावेळी बोलताना भावनावेगानं फेडररचं अडखळणं, चाहत्यांमधून आलेल्या ‘We still love you Roger’च्या आरोळ्या आणि अखेर टेनिसच्या महानायकाच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू..
होय. फेडरर रडला. एखाद्या लहान मुलासारखं निरागसपणे त्यानं आपल्या भावनांना वाट करून दिली. पण ते अश्रू पराभवाचे किंवा त्यामुळं झालेल्या निराशेचे नव्हते. तर स्वतःच्या चुकांमुळं जेतेपदाची संधी गमावल्याची खंत त्याला डाचत होती. आणि या परिस्थितीतही आपल्या चाहत्यांनी आपली साथ सोडलेली नाहीय, हे त्याला कळत होतं.
फेडररच्या त्या अश्रूंनी प्रतिस्पर्धी नदालही भारावून गेला. लीजंडरी रॉड लेव्हरच्या हातून ट्रॉफी स्वीकारल्यावर नदालनं सर्वात आधी फेडररला आलिंगन दिलं. कुणीतरी म्हटलंच आहे, "A man must be a hero to understand a hero". आणि नदालनं तेच दाखवून दिलं.
खरंतर हा सामना सुरू होण्याआधी माजी टेनिसपटू जॉन न्यूकोम्बचा अपवाद वगळता कोणीही नदालला जेतेपदासाठी फेव्हरेट मानत नव्हतं. अगदी रॉड लेव्हरपासून ते जॉन मॅकेनरोपर्यंत सर्वांनीच फेडररच्या बाजूनं झुकतं माप दिलं. पण त्या सर्वांचे अंदाज नदालनं खोटे ठरवलेयत.
क्ले कोर्टच्या बादशाहनं आधी विम्बल्डनची हिरवळ गाजवली आणि आता मेलबर्न पार्कवर कब्जा करत आपलं अव्वल स्थानही सिद्ध केलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मिळणा-या प्रत्येक विजयाबरोबरच त्याचा स्वभावही अधिकाधिक विनम्र बनत चाललाय- एखाद्या ख-या चॅम्पियनसारखाच.
फेडरर चौदा ग्रँड स्लॅम जिंकत पीट सॅम्प्रसच्या रेकॉर्डची बरोबरी करेलही, पुढं जाऊन तो त्याचा हा रेकॉर्ड मोडेलही. कदाचित आपलं अव्वल स्थानही तो परत मिळवेल. पण वय आणि फॉर्म सध्या नदालची साथ देतायत. फेडररनं वयाच्या तेविसाव्या वर्षी आपलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवलं होतं, तर तेविसाव्या वर्षी नदालच्या खात्यात सहा जेतेपदं जमा आहेत, हे विसरून चालणार नाही.
फेडरर आणि नदालमधल्या रायव्हलरीच्या या कहाणीचा शेवट कोणाच्याही बाजूनं होवो, त्यांच्यात रंगणा-या प्रत्येक सामन्याबरोबर टेनिस आणखी समृद्ध होत चाललंय.
No comments:
Post a Comment