Tuesday, March 3, 2009

लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर झालेल्या हल्ल्यानं क्रिकेट जगत सुन्न झालंय. दहशतवादापासून क्रिकेट दूर नाही, आतंकवादाचा हा भस्मासूर कोणाचाही बळी घेऊ शकतो, हे दाहक वास्तव पुन्हा एकदा प्रकर्षानं पुढं आलंय.

आजवर क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाचे डावपेच अनेकदा खेळले गेलेयत. पण एखाद्या अतिरेकी संघटनेनं क्रिकेटपटूंवरच थेट सशस्त्र हल्ला करण्यची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही ही घटना पाकिस्तानसारख्या क्रिकेटवेड्या देशात व्हावी ह्यासारखं दुर्दैव नाही.

खेळाची मैदानं आणि खेळाडू दहशतवाद्यांसाठीही सॉफ्ट टारगेट बनत चालले आहेत. खेळाडूंवर, स्टेडियमवर हल्ला केला म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जाणार याची हल्लेखोरांना खात्री असते. त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न आजवर अनेक अतिरेकी संघटनांनी केलाय. खेळांच्या इतिहासतल्या अशाच काही रक्तरंजित घटनांचा हा एक आढावा:

1) म्युनिक हत्याकांड १९७२ – ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या इस्राएलच्या ११ खेळाडूंचं ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेकडून अपहरण आणि हत्या.

ऑलिम्पिक म्हणजे जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचं प्रतीक. पण १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकदरम्यान जे घडलं त्यातून सावरायला जगाला बराच वेळ लागला होता. ऑलिम्पिक म्हणजे दुस-या महायुद्धातून उभं राहणा-या जर्मनीसाठी आपली प्रगतीच्या दिशेनं चाललेली वाटचाल जगापुढे आणण्याची मोठी संधी होती. पण जगाच्या इतिहासात म्युनिक ऑलिम्पिकची नोंद वेगळ्याच कारणासाठी व्हायची होती.

५ सप्टेंबर १९७२ रोजी पहाटे अतिरेकी संघटना ब्लॅक सप्टेंबरच्या आठ सदस्यांनी म्युनिक ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इस्राएली खेळाडूंच्या डॉर्मिटरीत शस्त्रास्त्रांसह गुपचूप प्रवेश केला. हल्लेखोरांनी दोन इस्राएलींना ठार केलं तर इतर नऊ जणांना ओलिस ठेवलं. खेळाडूंच्या बदल्यात इस्राएलच्या ताब्यातील २००हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. जर्मन सरकारबरोबर दिवसभर असफल वाटाघाटी केल्यावर अपहरणकर्त्यांनी ओलिसांसह जर्मनीबाहेर जाण्याची मागणी केली. मात्र विमानतळावर जर्मन स्नायपर्सबरोबर झालेल्या चकमकीत सर्व नऊ खेळाडूंबरोबरच पाच अतिरेकी मृत्यूमुखी पडले.

म्युनिक ऑलिम्पिकपूर्वी ऑलिम्पिक व्हिलेज म्हणजे उत्सवाचा मांडव असायचा. १९७२ नंतर प्रत्येक ऑलिम्पिकच्या वेळी ऑलिम्पिक व्हिलेजला लष्करी तळाचं रुप प्राप्त झालेल दिसलं.

एरवी ‘मध्यपूर्वेतली राष्ट्रं पाहून घेतील, हा त्यांचा प्रश्नंय’ अशीच बहुतांशी युरोपियन राष्ट्रांची पश्चिम आशियातल्या अस्थिरतेवरची भूमिका असे. पण म्युनिकनंतर हे सगळं बदललं. पॅलेस्टाईन आणि इस्राएलमधला वाद त्यामुळं आंतरराष्ट्रीय समुदायापुढचा कळीचा मुद्दा बनला.

‘ब्लॅक सप्टेंबर’च्या त्या यशामुळं इतर अतिरेकी संघटनांनाही हिंसाचाराचा एक सोपा मार्ग दिसून आला आणि खेळांची मैदानंही सुरक्षित राहणार नाहीत ह्याची जगाला जाणीव झाली.

२) १९८७ - सेऊल ऑलिम्पिक तोंडावर आलेलं असताना, कोरियन एअरलाईन्सचं एक विमान ब्रह्मदेशाच्या हवाई हद्दीत झालेल्या स्फोटात नष्ट झालं. ही घटना म्हणजे अपघात नसून ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम घडवण्याचा उत्तर कोरियन अतिरेक्यांचा प्रयत्न होता असा दावा दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चुन हुआन यांनी केला.

३) १९९२ – इटीए या स्पॅनिश फुटीरतावादी गटानं बार्सेलोना ऑलिम्पिकदरम्यान हल्ला करणार असल्याची धमकी दिली. मात्र कोणताही घातपात झाला नाही, त्यामुळं आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

४) १९९६ – २७ जुलैच्या सकाळी अटलांटा इथं ऑलिम्पिक सेंटेनियल पार्कजवळ एका पाईपबॉम्बच्या स्फोटात एक मृत्युमुखी आणि १०० जखमी. अमेरिकेतील एका अंतर्गत अतिरेकी गटाचा सदस्य एरिक रॉबर्ट रुडॉल्फला हल्ल्यासाठी दोषी मानण्यात आलं.

५) २००३ – अथेन्स ऑलिम्पिकची तयारी सुरू असतानाच २२ जून रोजी ग्रीसच्या अधिका-यांनी प्लॅतियाली या लहानशा बंदराजवळ एक जहाज ताब्यात घेतलं. जहाजावरून तब्बल ७५० टन स्फोटकं जप्त करण्यात आली.

६) ५ मे २००४ – अथेन्सच्या एका उपनगरात पोलिस स्टेशनबाहेर ३ बॉम्बस्फोट. ‘रिव्होल्युशनरी स्ट्रगल’ या ग्रीक अतिरेकी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, तसंच ऑलिम्पिकदरम्यान घातपात करण्याचा इरादा जाहीर केला.