Saturday, June 7, 2008

इट्स नॉट अॅट ऑल टेरिबल

माहितीच्या महाजालातला असाच एक मुक्त कट्टा (म्हणजे online forum हो!) वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा अगदी रंगात आलेली. जगाच्या वेगवेगळ्या कोप-यांत राहणारे आम्ही नेटफ्रेन्डस् डिस्कस करत होतो कुठल्या तरी वेगळ्याच विषयावर. पण बघता बघता गाडी पावसाकडे वळली.

मी सहजच म्हटलं (म्हणजे टाईप केलं) ‘It’s time for Monsoon! We’ll get rains again… ’ आता लवकरच मॉन्सून येईल...

पॅट - ‘Oh that sounds terrible! Janhavee, you should be careful...’

पॅटचं ते उत्तर ऐकून मी चक्रावूनच गेले. (बाकी तिची उत्तरं अशी नेहमीच चक्रावणारी असतात, तिच्या गावच्या म्हणजे लंडनच्या पावसासारखीच – totally unpredictable)

मी - ‘what’s so terrible about it? त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? मला तर पाऊस आवडतो. I just enjoy it so much!’

पॅट - “Oh really? (हा ‘really’ अगदी खास यॉर्कशायर अॅक्सेंटमध्ये हं!) I thought Monsoon rains are destructive?’

मी - ‘Sometimes, yes, they are, of course. But they give us water, they give us relief from heat and they are REALLY beautiful to watch’ (हा ‘REALLY’ मात्र अस्सल मराठी... अर्थात त्याला ‘खर्रच’ची सर नाही... :) )

पॅट – Well, hear they always show that you people are having floods because of monsoon. (Oh! आता बीबीसीवाले आणि सगळेच फक्त भरलेल्या नद्या, बुडालेली शेतं, तुंबलेले रस्ते आणि वाहणारी गटारं दाखवतात, त्याला मी काय करणार?)


आमच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या. हळूहळू बाकीचेही त्यात सहभागी झाले. आणि मॉन्सूनचा अनुभव घ्यायला एकदा तरी भारतात येण्याचं कबूल करून सगळ्यांनी निरोप घेतला.


एव्हाना बाहेर गार वारा वाहायला सुरूवात झाली होती. थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. माझ्या डोक्यात मात्र अजूनही पॅटचाच प्रश्न घोंघावत होता. तीच कशाला, ‘पाऊस? अरे बापरे!’ असं म्हणणारे मला मुंबईतही भेटलेयत. मुंबईकरांना पावसाचा आनंद कधीच का लुटता येत नाही?


एक मात्र खरंय, अलीकडे मुंबईचा पाऊस म्हटलं की फक्त टेन्शनच येतं. आकाशात काळोखी, बोचरा वारा, पडलेली झाडं, खड्ड्यांमधून वाट काढत चालणारे लोक, पाण्याखाली गायब झालेले रस्ते, खोळंबलेलं ट्रॅफिक, अडकलेल्या लोकल ट्रेन्स, ट्रेनमधली गर्दी आणि त्या गर्दीतूनही वाट काढत आत शिरणारी पावसाची सर... आणि या सगळ्या परिस्थितीत ऑफिस आणि घर गाठण्यासाठीची धावपळ...


पण कधी विचार केलाय ? मुंबईचा पाऊस याहीपेक्षा वेगळा असू शकतो? कधी बघितलेयत मुंबईतल्या बदलत्या निसर्गाचे रंग?


पण कधी बघणार? धावताधावता श्वास घ्यायलाही आम्हाला वेळ नसतो. तरी नशीब, आम्हा मुंबईकरांना आकाशाचं दर्शन अगदीच दुर्मिळ नाही. इथं काही लंडन- न्यूयॉर्कवासीयांसारखं उंच इमारतींच्या गर्दीत आकाशाचा तुकडा शोधावा लागत नाही. (अजूनतरी!) याच मोकळ्या आकाशात एखाद्या दिवशी काळोखी आल्याचं जाणवतं आणि अचानक पाऊस कोसळू लागतो... मुंबईचा पाऊस...


तो येतो कोणतीही वर्दी न देता. आपल्याला बेसावध गाठून भिजवण्यात मुंबईचा पाऊस अगदी पटाईत. जणू लोकांची ( आणि बीएमसीची ) त्रेधा उडवण्याचा त्याला छंदच आहे. (आणि पावसाच्या नावानं खडे फोडण्याचा आम्हाला.)


मुंबईचा पाऊस... तो येतो, आणि सगळं शहर धुक्यात हरवून जातं... अगदी एखाद्या स्वप्नातल्या नगरीसारखं... तो येतो आणि सगळी हवा कशी फ्रेश फ्रेश होऊन जाते..


मुंबईचा पाऊस... अगदी unique असतो बरं का! तो येतो पण मृद्-गंधाशिवायच... (अहो, मुंबईत तेवढीतरी माती शिल्लक कुठे राहिलीय?) तो येतो समुद्रावरून, गेट –वे, मरिन ड्राईव्हवर धडकणा-या लाटांवर स्वार होऊन... मुंबईच्या पावसाची खरी मजा अनुभवायची असेल तर समुद्रकिना-यासारखी जागा नाही. खवळलेल्या समुद्रात पावसाचं तांडव पाहताना वेळेचं भान रहात नाही. (पण समुद्राला भरती आली असेल तर जरा जपूनच) समुद्राचा कंटाळा आला असेल तर डोंगर आणि धबधबेही फार दूर नाहीत. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तर पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबरच हिरवा रंग चढत जातो.. जरा शहराबाहेर पडाल तर कर्जत, खोपोली, कर्नाळा, माळशेजचा पाऊस तुमची वाटच पहात असतो.


पण शहरात राहूनही पावसाची मजा लुटता येते बरं! एखाद्या कट्टयावर, कोप-यावरच्या हॉटेलात किंवा अगदी ऑफिसमध्येही मित्र-मैत्रिणींचा अड्डा, चहा- कॉफीचे वाफाळते कप, भजी आणि भरपूर गप्पा...). पाऊस जवळ आला की मुंबईच्या फॅशन स्ट्रीटचं रुपडंही पालटतं. भिजत भिजत खरेदी करण्यातही धमाल असते. पण खरी मजा येते ती मुंबईतल्या रिमझिमत्या पावसात वरळी किंवा पाम बीच हाय-वेवर लाँगड्राईव्ह करताना (अर्थातच ट्रॅफिक कमी झाल्यावर) रस्त्यावर टिपटिपणारे थेंब, गाडीचा वेग आणि सोबतीला आवडती व्यक्ती, आवडती गाणी असतील, तर भाई, जीना इसी का नाम है!


आणि समजा, घरात एकटेच असाल तर जरा खिडकीच्या बाहेर डोकावून तर पहा! कळणारही नाही हा पाऊस आपला मित्र कधी बनून जाईल ते...


रिअली पॅट, तुला कधीच कळणार नाही, आमचा पाऊस टेरिबल नाही तर अगदी रोमँटिकही आहे..


No comments: